लातूर–नांदेड परिक्षेत्रात जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई३८ लाखांहून अधिक रोकड जप्त, ३९ जणांवर गुन्हे दाखल


लातूर–नांदेड परिक्षेत्रात जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई
३८ लाखांहून अधिक रोकड जप्त, ३९ जणांवर गुन्हे दाखल
नांदेड | प्रतिनिधी
पोलीस उपमहानिरीक्षक, लातूर परिक्षेत्र यांच्या आदेशानुसार लातूर व नांदेड परिक्षेत्रात जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईत तब्बल ३८ लाख ६८ हजार रुपयांची रोकड, ५ लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच ३९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ३९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीर व नांदेड शहरातील विविध ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाचारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. दि. २७ जानेवारी २०२६ रोजी उदगीर शहरात छापा टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत १२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार २०० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दि. ३० जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरातील पोष्टे इतवारा हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये २५ आरोपींना अटक करून २ लाख ३४ हजार १०० रुपये रोकड व २७ मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणीही संबंधित आरोपींवर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, इतवारा पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या कारवायांमध्ये आणखी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३१ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. एकूण कारवाईत ३ जिवंत कोंबड्या व अन्य साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक लातूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाचारे, पोलीस उपनिरीक्षक, अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, अवैध जुगार व्यवसायाची माहिती नागरिकांनी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा १०० / ९१ ५० १०० १०० या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.