*प्रिय विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा !*• भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षेसाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विद्यार्थ्यांना आवाहन• कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना

*प्रिय विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा !*

• भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षेसाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
• कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना

लातूर, दि. ०८ (जिमाका) : प्रिय विद्यार्थ्यांनो..., तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी काळात तुम्ही आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इयत्ता बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना केले आहे. तसेच भयमुक्त-कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. या काळात सर्व विद्यार्थ्यांनी निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते ज्ञानवृद्धी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा आणि प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. भोसले यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढवा, यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आगामी काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी कटिबद्ध आहे. राज्यात कॉपी प्रकाराला पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी, कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.  महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात, असे पालकमंत्री ना. भोसले यांनी इयत्ता बारावी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.