*राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*
*राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*
लातूर, दि. 21 : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त २५ जानेवारी २०२५ रोजी गाव ते जिल्हा पातळीवर विविध उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये सर्व शासकीय विभागांसह खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये यांनीही सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. राष्ट्रीय मतदार दिवस पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, संदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, शासकीय महिला निवासी तंत्र निकेतनचे प्राचार्य श्री. राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, निवडणूक नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृतीसाठी प्रभात फेरी, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक गावामध्ये राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दयानंद सभागृह येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची त्यांनी माहिती दिली.